Article published in Thanevarta - 18 January 2018
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयानं अंबिका योग कुटिरला योग स्कूल म्हणून मान्यता दिली आहे. एका पत्रकार परिषदेत अंबिका योग कुटिरचे सचिव रामचंद्र सुर्वे यांनी ही माहिती दिली. अंबिका योग कुटिरतर्फे ठाण्यामध्ये योगा विषयक विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं. अंबिका योग कुटिरचे निकम गुरूजी यांनी १९६५ मध्ये अंबिका योग कुटिरची स्थापना केली. गेल्या वर्षी निकम गुरूजी यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं झालं. अंबिका योग कुटिरला योग स्कूल म्हणून मान्यता मिळाल्यानं ठाण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यातील आयुष मंत्रालयातर्फे योग चिकित्सा पध्दतीचा आराखडा तयार करण्यासाठी कुटिरचे सचिव रामचंद्र सुर्वे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी आपला आराखडा अलिकडेच शासनाला सादर केला आहे. अंबिका योग कुटिरतर्फे कुटिरात योग साधनेसाठी येणा-या साधकांच्या अनुभवांची शास्त्रशुध्द नोंदणी करून स्वास्थ्य योग शिबिराद्वारे त्याची माहिती जनमानसापर्यंत पोहचवली जाणार असल्याचं सुर्वे यांनी सांगितलं. यंदा १ फेब्रुवारीला अंबिका योग कुटिरमध्ये योग इंस्ट्रक्टर कोर्सची पहिली परिक्षा होणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. अंबिका योग कुटिरतर्फे ठाणे, नवी मुंबईसह देशा-परदेशात ९२ केंद्रातून योगाभ्यास वर्ग चालवले जातात. वारंवार सर्दी, डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अंबिका योग कुटिरनं तयार केलेलं नेती पात्र सध्या विदेशात निर्यात केलं जात आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशी १८०० पात्रं पाठवली जात असून तेथील रूग्णांना त्याचा मोठा फायदा झाल्याचंही रामचंद्र सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.